भौगोलिक माहिती

भौगोलिक स्थिती

नांदेड जिल्हा उत्तर अक्षांश १८० १६’ ते १९० ५५’ व पूर्व रेखांश ७६० ५५’ ते ७८०१९’ या दरम्यान पसरलेला आहे. तो भौगोलिकदृष्ट्या खंडांतर्गत स्थितीनुसार महाराष्ट्र राज्याच्या मध्यपूर्व भागात, अरबी सागर व बंगालच्या खाडीपासून दूर व भारत भूखंडाच्या मध्यांतर्गत भागात वसलेला आहे.

 

प्राकृतिक पर्यावरण

नांदेड हे गोदावरीच्या नाभिस्थान वसलेले शहर आहे. नदीच्या खोऱ्याचा भाग हा सपाट मैदानाचा आहे. गोदावरीच्या खोऱ्यात असलेली बहुतेक जमीन काळी सुपीक व ठिसूळ आहे. नांदेड शहर परिसरातील भूस्वरुपाची विभागणी १. टेकड्या, २. सपाट पठाराचा भूभाग, ३. नदीकाठच्या तटीय प्रदेश या प्रकारात झालेली आढळून येते. केवळ शहर परिसरच नसून एकंदर जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत टेकड्यांचे क्षेत्रफळाची टक्केवारी १.३६% तर सपाट पठाराच्या क्षेत्रफळाची टक्केवारी ७७.६० इतकी आहे आणि पूर मैदान/ नदी काठच्या तटीय प्रदेशाच्या क्षेत्रफळाची टक्केवारी २०.८३ आहे. यावरून नांदेड परीसारातही टेकड्यांचे प्रमाण अत्याल्प आहे तर बहुतांश भूभाग पठारांनी व्यापलेला आहे. त्याखालोखाल प्रमाण नदीच्या तटीय प्रदेशातील काळ्या व सुपीक मातीच्या भूभागाची आहे. विविध भूरुपीय प्रक्रियांचा प्रदेशाच्या ठेवणीवर परिणाम होतो. नांदेड जिल्हा दख्खनच्या पठारावर वसलेला आहे. येथील प्रदेश हा जवळपास सपाट मैदानी प्रदेशांतर्गत जरी मोडत असला तरी डोंगराळ भाग सुद्धा येथे आढळून येतो. प्राकृतिकरित्या जिल्हा तीन घटकात विभागला आहे. उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश :- सातमाळा व निर्मल या डोंगराच्या रांगा या भागात येतात. उत्तरेकडील भोकर, हिमायतनगर, हदगाव, माहूर व किनवट तालुक्यांचा बहुतांश भाग या विभागात येतो. मध्यभागातील गोदावरी खोऱ्यांचा भाग :- दक्षीणेकडील गंगा म्हणून प्रसिद्ध असलेली गोदावरी नदी हि उत्तरेकडील व दक्षिणेकडील डोंगराळ भागांच्या मधल्या भागातून वाहते. नांदेड, धर्माबाद, लोहा, नायगाव, बिलोली, आणि देगलूर हा प्रदेश गोदावरी नदीमुळे कृषीसमृद्ध झाला आहे व येथील जमीन सुपीक आहे. दक्षिणेकडील डोंगराळ भाग :- दक्षिणेकडील मुखेड व कंधार तालुका हे प्रामुख्याने या विभागात येतात. या शिवाय देगलूर तालुक्याच्या दक्षिणेकडील भागाचाही समवेश यात होतो. जिल्ह्यात आढळून येणाऱ्या डोंगरांच्या रांगा याप्रमुख्याने वायव्य, आग्नेय, या दोषेला एकमेकांना समांतर पसरलेल्या आहेत.

भूजल

भूजल उपलब्धीच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील भूस्तरीय रचना महत्वाची ठरते. जिल्ह्यातील भूस्तरीय रचनेचे स्थूलमानाने तीन विभाग करता येतील. (१)आर्कीयन-ग्रेनाईट, (२)क्रितेशिअस ते इओसिन-बेसाल्ट आणि इंटर ट्रेपिअन बैडस,(३)रीसेर्ट-अल्युव्हीयल. यापैकी पहिल्या विभागातील खडक बिलोली आणि देगलूर तालुक्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात तसेच किनवट शहराच्या उत्तर व दक्षिणेस पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर पसरलेला आहे. ग्रेनाईट ह्या खडकामध्ये जास्त विघटन झालेल्या स्तरामध्ये पाणी आढळून येते. ह्या खडकामध्ये व्हेदरिंग १४ ते ३० मीटरपर्यंत आहे. ग्रेनाईट असल्यामुळे पाणी लागत नाही आणि आवेधनाचे काम होऊ शकत नाही. या भागातील विंधन विहीरीची क्षमता ४,000 लिटर्स ते १५,000 लिटर्स प्रती तास आढळून येते. पाण्याची स्थिर पातळी ५ मीटरपासून १५ मीटरपर्यंत आहे. विंधन विहिरीच्या यशस्वीतेचे प्रमाण ८५% ते ९०% आहे.

हवामान

नैऋत्य मान्सूनमुळे पडणारा पावसाळ्याचा ऋतू वगळता या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे एका वर्षात चार ऋतू असतात. त्यात हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपयर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापयर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापयर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. पर्जन्यमान : या जिल्ह्यात नऊ पर्जन्यमापक केंद्रे असून दहा वर्षांपासून ते अठ्ठेचाळीस वर्षापर्यंतची पर्जन्यवीषयक आकडेवारी येथे उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ९९१.५ मि.मी. (जनगणनाअहवाल २००१ नुसार ही सरासरी ८९७.८ मि.मी. दर्शवली) आहे. त्यातील नैऋत्य मोसमी वा−यापासून पडणा−या पावसाचे प्रमाण हे एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८६ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. या जिल्ह्यातील पर्जन्याचा सर्वसाधारण आलेख पाहिला तर असे दिसून येते की, जिल्ह्यात पश्चीमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. तापमान : जिल्ह्यात हवामान विषयक निरीक्षणे घेणारी वेधशाळा फक्त नांदेड या ठिकाणी आहे. ऋतुनुसार जिल्ह्यातील तापमानामध्ये खूप बदल होतो. जेव्हा तापमानात घट होऊ लागते, तेव्हा नोव्हेंबरच्या शेवटी हिवाळ्याची चाहूल लागते. डिसेंबर सर्वाधीक थंडीचा महिना. या महिन्यातील सरासरी किमान (न्यूनत्तम) तापमान १३.१ डिग्री सेल्सीअस आणि सरासरी कमाल (उच्चत्तम) तापमान ३०.२ डिग्री सेल्सीअस असते. थंडीच्या मोसमात जिल्ह्याला थंडीच्या लाटेचा फटका बसण्याची काही वेळा शक्यता असते. उत्तर भारतात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे पश्चिमी वारे यामुळे या थंडीच्या लाटा येतात. अशावेळी किमान तापमान ५ डिग्री सेल्सीअस पर्यंत घसरते. मार्च ते मे या कालावधीत दिवसाचे आणि रात्रीचे तापमान सतत वाढत जाते. मे हा वर्षातील सर्वाधिक तापमान असणारा महिना. या महिन्यात दैनंदिन सरासरी कमाल तापमान ४२ डिग्री सेल्सीअस इतके असते तथापि दैनंदिन सरासरी किमान तापमान हे २६ डिग्री सेल्सीअस असते. कधी कधी या कालावधीत तापमान ४७ डिग्री सेल्सीअस पर्यत पोहचते. जिल्ह्यातील नैऋत्य मान्सून पावसाच्या प्रगतीबरोबरच साधारण जूनच्या मध्यावधीस तापमानात अमुलाग्र घट जाणवू लागते आणि संपूर्ण मोसमी ऋतुमध्ये हवामान आल्हाददायी असते. ऑक्टोबरच्या सुरूवातीस जिल्ह्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासास सुरूवात होते आणि दिवसाचे तापमान हळू हळू वाढू लागते. ऑक्टोबरमध्ये द्वितीय कमाल तापमानाची नोंद होते. त्यानंतर दिवसा आणि रात्रीच्या दोन्ही तापमानात घट होते. जिल्ह्यात नांदेड येथे कमाल तापमान 46.7 डिग्री सेल्सीअस इतके दिनांक ४ जून १९९५ रोजी, तर सर्वात कमी (किमान) तापमान ३.६ डिग्री सेल्सीअस इतके दिनांक २८ डिसेंबर १९८३ रोजी नोंदविले गेले आहे.

वनक्षेत्र

जिल्ह्यातील वनक्षेत्र हे उपवनसंरक्षक यांच्या नियंत्रणाखाली आहे. वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी नांदेड येथे वन अधिका−याचे विभागीय कार्यालय कार्यरत आहे. जिल्ह्यात सन १९७१ मध्ये १२३३.७७ चौ.कि.मी. वनक्षेत्र होते. ते सध्या १२९९.१० चौ.कि.मी. असून त्यापैकी वन विकास महामंडळ किनवट यांना १७३.६३ चौ.कि.मी. वनक्षेत्र हस्तांतरीत करण्यात आल्याने नांदेड वन विभागाकडे सद्यस्थितीत १२२५.४७ चौ.कि.मी. वनक्षेत्र शिल्लक आहे. त्यापैकी राखीव वनक्षेत्र १०८६.५४ चौ.कि.मी. आहे. संरक्षित वनक्षेत्र १५.१० चौ.कि.मी. आहे. अवगीकृत वनक्षेत्र ४७.३८ चौ.कि.मी. आहे. तर पर्यायी वनीकरण क्षेत्र १९.३३ चौ.कि.मी. आहे. जिल्ह्यात नांदेडवन विभागाच्या आणि वनविकास महामंडळाच्या अधिपत्याखालील क्षेत्र वगळता इतर महसूल विभागाकडे अधीघोशीत वनक्षेत्र नाही. महसूल विभागाकडे असलेले गायरान वनेत्तर क्षेत्र हे मागील १९९२ ते २००८ पर्यत ३२८४ हेक्टर वनक्षेत्र वन विभागाने ताब्यात घेऊन ते संरक्षित वन जाहीर केले आहे. जिल्ह्यात एकूण भौगोलिक क्षेत्राशी वनक्षेत्राची टक्केवारी १२.२२ इतकी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने जंगलव्याप्त क्षेत्र जवळ जवळ ३३ टक्के असणे आवश्यक असून जंगलाखालील क्षेत्र वाढविणे आवश्यक आहे. हे जंगलव्याप्त क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने वने व सामाजिक वनीकरण खाते प्रयत्न करीत आहेत. त्या अंतर्गतत वन विभागाच्या सन २००१-०२ ते २०१०-११ या कालावधीच्या सुधारीत कार्य आयोजनेस केंद्रशासनाने दिनांक ६ डिसेंबर२००१ मध्ये मंजुरी दिलेली असून सदर मंजूर सुधारित कार्य आयोजनेत एकूण ७ कार्यवर्तुळे आहेत. त्यापैकी ४ कार्यवर्तुळात नांदेड वन विभागाचे संपूर्ण क्षेत्र समाविष्ट असून इतर ३ अतिव्याप्ती कार्यवर्तुळे आहेत. वनक्षेत्रात करावयाच्या कार्यासाठी निर्धारीत कार्यवर्तुळात 1) आरक्षणयुक्त स्थूणवन (फुटोरा वृक्ष) कार्यवर्तुळ, 2) सुधार प्रबंधन कार्यवर्तुळ, 3) वनीकरण कार्यवर्तुळ, 4) कुरण विकास कार्यवर्तुळ अशी आहेत व अतिव्याप्ती कार्यवर्तुळामध्ये 1) गैर इमारती (वनउपज) अतिव्याप्ती कार्यवर्तुळ, 2)वन्यप्राणी (अतिव्याप्ती) कार्यवर्तुळ, 3) संकीर्ण अतिव्याप्ती कार्यवर्तुळ ही कार्यवर्तुळ आहेत. सन २००२-०३पासून कार्यआयोजनेची अंमलबजावणी सुरू आहे. नांदेड वन विभाग व वनविकास महामंडळाअंतर्गततच्या वनक्षेत्रात पूर्ण नांदेड जिल्ह्याच्या भौगोलिक भागाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण भागात अत्यंत विरळ झाडोरा व पडीत वनक्षेत्राची व्याप्ती जास्त आहे. नांदेड वन विभागात एकूण ११२५४७.०९० हेक्टर वनक्षेत्र असून त्याच्या प्रशासकीय व्यवस्थापनासाठी ते एकूण १२ वनपरिक्षेत्रात विभागण्यात आलेले आहे. त्यात माहूर, किनवट, मांडवी, बोधडी, इस्लापूर, अप्पाराव पेठ, भोकर, हदगाव, हिमायतनगर, नांदेड, मुखेड व देगलूर ही वनपरिक्षेत्रे आहेत. जिल्ह्यात किनवट तालुक्यात सर्वाधिक वनक्षेत्र असून त्याखालोखाल भोकर तालुक्याचा क्रमांक लागतो.