मु. का. अ. अशोक शिनगारे यांचा सत्कार
प्रसीध्दी दिनांक September 5, 2017

मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांचा अप्पर मुख्य सचिव यांच्या हस्ते सत्कार

नांदेड (एनएनएल) केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंञालयाच्या वतीने आयोजित स्वच्छाथॉन 1.0 या देश पातळीवरील स्पर्धेत नांदेड जिल्हा परिषदेने स्वच्छतेसाठी वर्तनात झालेला बदल विषयावर ऑनलाईन प्रवेशिका केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली होती. पहिल्या फेरीत नांदेड जिल्हा परिषदेने या प्रवेशिकेची दिल्ली येथे सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे.

याबद्दल राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांचा बुके देवून औरंगाबाद येथे काल सोमवार दिनांक 4 सप्‍टेंबर रोजी सत्कार केला. अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी काल मराठवाडा विभागातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांची स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर , पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव रुचेश जयवंशी, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक डॉ. सतीश उमरीकर, जलस्वराज्य प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. दिलीप देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी उपसचिव यांनी सविस्तर सादरीकरणातून तालुकानिहाय स्वच्छतेची सद्यस्थिती मांडली. विभागाचे आयुक्त यांनी मराठवाडयात सध्या सुरू असलेल्या मोहिमेबाबत सादरीकरण केले. मराठवाडयातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही आपाआपल्या जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबत स्थितीचे सादरीकरण केले.

सध्या विभागात वेगाने कामे सुरू असल्याची परिस्थिती असली तरी राज्याच्या एकूण शिल्लक कामात मराठवाड्यातच सर्वात जास्त काम शिल्लक आहे याची जाणीव होण्यास या बैठकीची मदत झाली. येत्या डिसेंबर पर्यंत मराठवाडा हागणदारीमुक्त होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याबाबत विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री शामलाल गोयल यांनी समाधान व्यक्त करतानाच प्रत्येक दिवसाचे नियोजन करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी या महत्वपूर्ण बैठकीचे नियोजन अतिशय बारकाईने केले. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाडा येत्या दोन महिन्यातच हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प या बैठकीत केला. विभागाचे अप्पर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, आपण सर्वांनी ठरवले तर हे काम आपण विहित वेळेच्याही आधी संपवू शकतो. मराठवाडयातील सर्व अधिकाऱ्यांनी आव्हान स्वीकारले त्याबद्दल अभिनंदन केले.